चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

Thu 17-Sep-2026,04:23 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

 हिंगोली : वसमत शहरात आज भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि समयबद्ध चौकशी करून हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांच्याकडे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधीवर झालेला अशा प्रकारचा हल्ला हा केवळ एका व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न नसून लोकशाही, संविधानिक मूल्ये, कायदा-सुव्यवस्था आणि जनप्रतिनिधींच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील कट, षडयंत्र किंवा इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आ.अशोक कांबळे, हिंगोली जिल्हाध्यक्ष मास्टर महेंद्र सुनील घायाळवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.