दीक्षाभूमी मुक्तीसाठी हजारो बौद्ध बांधवांचा आक्रोश मोर्चा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यामुळे बौद्ध संस्कृतीच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झालेल्या चंद्रपूर दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन व विकासासंदर्भातील विविध मागण्यांसाठी गुरुवारी हजारो बौद्ध बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या सहकार्याने हा मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. यावेळी आंदोलकांनी चंद्रपूर दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनात बौद्ध-आंबेडकरी समाजाच्या प्रतिनिधींना योग्य स्थान देण्याची मागणी केली.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या व्यवस्थापन समितीत एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश राहू नये, तसेच जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व बौद्ध विहार मंडळांच्या अध्यक्षांचा सदस्य म्हणून समावेश करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम बौद्ध अनुयायांच्या वतीने आयोजित करण्यास शासनाने रॅली व कार्यक्रमाला परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
दीक्षाभूमीचा वापर व्यावसायिक अथवा राजकीय कार्यक्रमांसाठी करू नये, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान परिसरात तसेच संरक्षण भिंतीलगत स्टॉल लावण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणीही करण्यात आली. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिकांना कार्यक्रमासाठी अधिक जागा उपलब्ध होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाकडून उपलब्ध झालेला निधी परत जाऊ न देता त्यातून विकासकामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. ऐतिहासिक विहाराची मूळ रचना कायम ठेवूनच नूतनीकरण करावे.
महानगरपालिका चंद्रपूरकडून मंजूर करण्यात आलेल्या मूळ स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल करू नये, अशी भूमिकाही आंदोलकांनी मांडली.
मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करून मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
मोर्चात प्रतीक डोर्लीकर, ॲड. राजस खोबरागडे, लुंबिनी गणवीर, ॲड. प्रियंका चव्हाण, हर्षल खोब्रागडे, करण सोमकुवर, अभिलाष चुनारकर, युगान डवले, बंडू ठेंगरे, अशोक फुलझेले, सुरेश नारनवरे, जितेंद्र डोहणे, नम्रता रायपुरे, छाया थोरात, अनिता जोगे, आम्रपाली मेश्राम यांच्यासह हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले होते.