विसापूरमध्ये मध्यरात्री दुचाकीला आग : परिसरात भीतीचे वातावरण
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:तालुक्यातील विसापूर येथील शुभम प्रभुदास सातपुते यांच्या घरासमोर उभी ठेवलेल्या दुचाकीला १४ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना उघडकीस आली. या आगीत दुचाकी क्रं एम एच ३४ बी ए ७७३८ पूर्णपणे जळून खाक झाली असून अनंता कन्नाके यांच्या घराच्या गेटवर ठेवलेले ब्लॅंकेटही जळाले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सातपुते यांनी नेहमीप्रमाणे रात्री आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. रात्री दीड वाजताचा सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकीला आग लावली. ज्वाला आणि फुटण्यासारखा आवाज ऐकून सातपुते कुटुंबीयांसह शेजाऱ्यांची झोप मोडली. मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्याचवेळी अनंता कन्नाके यांच्या गेटवर ठेवलेले ब्लॅंकेटही जळाल्याचे आढळून आले.
शुभम यांनी ही दुचाकी सुमारे वर्षापूर्वी सेकंड हँड घेतली असून ती अद्याप त्यांच्या नावावर हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे तक्रार नोंदविताना त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांत विसापुर गावात चोरीच्या आणि संशयास्पद हालचालींच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी तसेच मध्यरात्री विनाकारण भटकणाऱ्या टवाळखोर युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींचा शोध घेण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.