यशवंत महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:वर्धा यशवंत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारी व जननायक बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गिरीश ठाकरे म्हणाले, “बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अद्वितीय क्रांतिकारी होते. त्यांनी शोषण, अन्याय व सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून आत्मसन्मानाची ज्योत पेटविली. आजच्या तरुणांनी त्यांच्या संघर्षातून जिद्द, परिश्रम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी.”
कार्यक्रमातील प्रमुख वक्ते प्रा. संदीपकुमार रायबोले यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत आदिवासी समाजजागृती, स्वाभिमान आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्ये, समता आणि लोकहिताचे तत्त्व आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय धोटे यांनी आयोजनाविषयी माहिती देताना आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे नीटनेटके संचालन डॉ. दीपक महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल काळे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. रवींद्र बेले, डॉ. नरेश कवाडे, डॉ. नत्थु खोडे, डॉ. बुद्धघोष लोहकरे, प्रा. एकनाथ मुरकुटे, डॉ. प्रमोद नारायणे, प्रा. संदीप चव्हाण, डॉ. अतुल सिदूरकर, डॉ. दीपक महाजन, प्रा. प्रफुल्ल काळे, डॉ. सरिता विश्वकर्मा, डॉ. आरती चौधरी, डॉ. योगिता ठाकरे, डॉ. प्रतिभा काटकर, डॉ. माधुरी सिडाम, डॉ. अर्चना दुपारे, डॉ. निकिता निर्मळ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेत प्रदीप चव्हाण, रियाज शेख व ऋषिकेश बोधाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्राचार्य यशवंत महाविद्यालय, वर्धा