क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी निरंतर सराव आवश्यक — आशा मेश्राम

Thu 13-Nov-2025,05:47 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : आजच्या युगात विद्यार्थ्यांसमोर खेळाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र शासनमान्य राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश संपादन करून ५% क्रीडा आरक्षणाचा लाभ घेऊन करिअर घडवायचे असल्यास, यश मिळेपर्यंत आपल्या खेळाचा सातत्यपूर्ण सराव करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. आशा मेश्राम यांनी केले.

त्या नुकत्याच गडचिरोली येथे झालेल्या नागपूर विभागीय आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंच्या सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या.

या कार्यक्रमाला तालुका क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, संदीप खोब्रागडे, सायली चन्नावर, जाधव सर, कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा प्रभारी अध्यक्ष निलेश राऊत, महासचिव मंगेश भोंगाडे, उपाध्यक्ष कृष्णा ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच विभागीय स्पर्धेत तब्बल १८ खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. ही स्पर्धा २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान बारामती (जि. पुणे) येथे होणार आहे.

या विजेत्या खेळाडूंमध्ये पुढीलप्रमाणे सहभागी आहेत —

१४ वर्षांखालील मुले: गौरव आसनी (२५ किलो)

१७ वर्षांखालील मुले: देवांशू लाखे (४५ किलो), भार्गव खेवले (५० किलो), नैतिक राऊत (५४ किलो), सान्विक लोंढासे (६२ किलो), कैवल्य सागरकर (८२ किलो), अर्णव लोखंडे (+८२ किलो)

१९ वर्षांखालील मुले: पियुष सिंग (३५ किलो), समीर देवतळे (६२ किलो), साहिल तेलहांडे (७० किलो), पियुष हावलदार (७८ किलो)

१४ वर्षांखालील मुली: मधुरा गावंडे (३० किलो)

१७ वर्षांखालील मुली: मोहिनी चूटे (४४ किलो)

१९ वर्षांखालील मुली: वैष्णवी इखार (३२ किलो), समीक्षा झाडे (४० किलो), स्नेहा बलवीर (५२ किलो), सानिया उरकुडे (५६ किलो), रीधा पठाण (६८ किलो)

या सर्व खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सौ. मेश्राम यांनी अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा कराटे संघटनेतर्फे बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता.

या वेळी राष्ट्रीय पंच सेन्साई ऋषभ सावसाकडे, सेन्साई वैभव साखरकर, सेन्साई दिलीप कठाणे, सेन्साई सलीम शेख, मुख्याध्यापक नंदकिशोर ठाकरे, यश चौधरी, बोनी देवढे, तसेच पालक दिलीप लोखंडे, योगेश इखार आणि अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि पालकांना दिले आहे.