बल्हारशाह रेल्वे स्टेशनवर बाल सुरक्षा दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान

Sun 23-Nov-2025,02:37 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्हारशहा :चाइल्ड हेल्पलाइन १०९८ व आरपीएफचा संयुक्त उपक्रम जागतिक बाल सुरक्षा दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, चंद्रपूर आणि चाइल्डलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरपीएफच्या सहकार्याने २० नोव्हेंबर रोजी बल्हारशाह रेल्वे स्टेशनवर बाल संरक्षणासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन स्टेशन प्रबंधक दशरथ सिंग यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आरपीएफ एएसआय मंगेश पायघन, रामनिवास यादव, जीआरपी चे अश्विन पनेलवार (जीआरपी), हेड टीटीई वंदना चिकनकर, तसेच तांत्रिक विभागाचे परशुराम क्षत्रिय, चाइल्डलाइन सुपरवायझर भास्कर ठाकूर, केस वर्कर्स त्रिवेणी हाडके, बबीता लोहकरे, धर्मेंद्र मेश्राम, विजय अमर्थराज, कुणाल घेर सह आदी मान्यवर उपस्थित होते.

रेल्वे कर्मचारी, वेंडर, सफाई कर्मचारी आणि प्रवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्टेशन प्रबंधक दशरथ सिंग यांनी सांगितले की, रेल्वे परिसरात २४ तास चाइल्डलाइनचे कार्य सुरू असते. कोणतेही समस्याग्रस्त, हरवलेले किंवा मदतीची गरज असलेले बालक दिसल्यास तत्काळ चाइल्डलाइन १०९८, रेल्वे पोलीस किंवा रेल्वे अधिकाऱ्यांना कळवावे, असे त्यांनी आवाहन केले.

चाइल्डलाइनचे भास्कर ठाकूर यांनी बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत विविध यंत्रणांची माहिती दिली. बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, बाल मजूरी निर्मूलन दल, बाल व्यापार प्रतिबंधक समिती, विशेष बाल पोलीस पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा पुनर्वसन समिती तसेच चाइल्डलाइन यांच्यामार्फत बालकांच्या संरक्षण, विकास, सहभाग आणि पुनर्वसनासाठी सातत्याने काम केले जाते, असे त्यांनी सांगितले.

लोकांनी एखादे असहाय किंवा संकटातील बालक दिसल्यास त्वरित १०९८ वर संपर्क साधावा, या अभियानातून आवाहन करण्यात आले. प्रवासी व बालकांनी स्वाक्षरी करून बाल संरक्षण उपक्रमाला पाठिंबा दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्रिवेणी हाडके यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र मेश्राम यांनी केले.