सालोड येथे दिव्यांग भवनाचे उद्घाटन व जागतिक अपंग दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक
सालोड सालोड:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचे उद्घाटन व जागतिक अपंग दिनाचा संयुक्त सोहळा दिनांक २८ डिसेंबर रोजी सालोड येथे सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सालोड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल कन्नाके होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच आशिष कुचेवार, ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे, पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष संजीव वाघ, दिव्यांग वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर,उपाध्यक्ष भीमराव वाघ,सचिव सपना इखार, वैभव गावंडे तसेच अब्दुल शेख गफूर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग भवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांचे हक्क, समस्या व सक्षमीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपसरपंच आशिष कुचेवार म्हणाले की, दिव्यांग बांधव हे समाजाचे सक्षम व महत्त्वाचे घटक असून त्यांना केवळ सहानुभूती नव्हे तर समान संधी देणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. जवळपास सर्व दिव्यांगांचे दिव्यांग ओळखपत्र तसेच आयुष्यमान भारत गोल्डन हेल्थ कार्ड तयार करण्यात आले असून, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शेड उभारून उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात दिव्यांग वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या सोहळ्यास फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांग भवनामुळे विविध उपक्रम, प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संजीव वाघ यांनी केले, तर आभार वैभव गावंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत शंभरकर, रोहन खेकडे, नामदेव मडावी व समीर सातपुडके यांनी विशेष परिश्रम घेतले.