बंद पॉवर हाऊस जागेचा कायापालट : ESIC रुग्णालय, SRPF केंद्र व महिला औद्योगिक वसाहत उभारणीचा मार्ग मोकळा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: येथे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या बंद पॉवर हाऊसच्या विस्तीर्ण शासकीय जमिनीला आता नवे सार्वजनिक रूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या जागेचा लोककल्याणासाठी प्रभावी वापर करण्याचा सर्वंकष प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असून, त्याला शासनस्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई येथील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घेत ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले.
त्यामुळे विकासाला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमीन भौगोलिकदृष्ट्या आणि दळणवळणाच्या सोयींमुळे सार्वजनिक प्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. या जागेवर पहिल्या टप्प्यात कामगारांसाठी ईएसआयसी अंतर्गत १०० बेडेड अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील औद्योगिक कामगारांना दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात राज्य राखीव पोलिस बलाचे (SRPF) केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या केंद्रामुळे प्रशिक्षण, निवास, क्रीडांगण, आरोग्य सुविधा तसेच नक्षलविरोधी मोहिमेसाठी आवश्यक अधोसंरचना एकाच ठिकाणी विकसित होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. एकाच ठिकाणी उद्योगपूरक सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन महिलांना स्वावलंबनाचा आधार मिळेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रस्तावांकडे गांभीर्याने पाहत प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या विकासात्मक पुढाकाराबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.