शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी येथे वीर बाल दिवस साजरा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Sat 27-Dec-2025,02:04 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी क्रांतिवीर राजा वेंकटप्पा नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान वैरागड येथील कु. प्रितम विनोद बनकर आणि कशीश ज्ञानेश्वर पत्रे यांचा सन्मानचिन्ह व भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला. कु. प्रितम बनकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य तसेच राज्यस्तरीय सांस्कृतिक उपक्रमांमधील योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. तर कशीश ज्ञानेश्वर पत्रे यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहायक प्राध्यापक होकम सर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कर्तव्यभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.