वडापाव ठरला ‘काळ’; वर्ध्यात फूड पॉइजनिंगमुळे ११वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Wed 04-Feb-2026,09:25 PM IST -07:00
Beach Activities

वडापाव ठरला ‘काळ’; वर्ध्यात फूड पॉइजनिंगमुळे ११वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

वर्धा : जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण

वर्धा शहरातील वंजारी चौक येथील महावीर गार्डनजवळ असलेल्या एका हातगाडीवरील वडापाव खाणे एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फूड पॉइजनिंग (विषबाधा)मुळे १७ वर्षीय रितेश ओंकारेश्वर मूडे या ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून बाहेरील खाद्यपदार्थांच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेचा क्रम : संध्याकाळी नाश्ता, सकाळी प्राणांतिका

सोमवारी सायंकाळी पाडेगाव येथील रहिवासी व न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजमध्ये ११वीत शिक्षण घेत असलेला रितेश मूडे याने वंजारी चौक परिसरातील एका हातगाडीवरून वडापाव खाल्ला. रात्री घरी परतल्यानंतर त्याला सतत उलट्या सुरू झाल्या. प्रकृती खालावल्याने त्याला सावंगी (मेघे) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सलाईन दिल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

मंगळवारी सकाळी पुन्हा प्रकृती गंभीर झाल्याने त्याला डॉ. प्रदीप कश्यप यांच्याकडे नेण्यात आले. स्थिती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात व नंतर सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान रितेशचा मृत्यू झाला.

नातेवाइकांची तक्रार; पोलीस तपास सुरू

रितेश रामनगर येथील परदेशीपुरा परिसरात भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आज होणार शवविच्छेदन

रितेशचा मृतदेह सेवाग्राम रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

आरोग्य विभागाचा इशारा

उघड्यावर विक्री होणारे खाद्यपदार्थ सेवन करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी तसेच कोणतीही लक्षणे दिसताच तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.