रेल्वे परिसरातून साडेतीन वर्षांच्या बालकाचे अपहरण,पोलिसांचा शोधमोहीमेला वेग
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : येथील रेल्वे परिसरातील गणपती बसविण्यात येणाऱ्या शेडमधून साडेतीन वर्षांच्या बालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाटे २ ते ४ वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजन कुंजाम रा. केसरी टोला, ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव, छत्तीसगड हे आपल्या पत्नी, साडेतीन वर्षांचा मुलगा व पाच महिन्यांच्या मुलीसह मागील सात-आठ महिन्यांपासून रेल्वे परिसरातील शेडमध्ये वास्तव्यास होते. ते यापूर्वी मेसन काम करत होते; मात्र काम बंद झाल्यानंतर ते रेल्वे स्टेशन परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विक्री करून उदरनिर्वाह करत होते.
राजन कुंजाम यांची पत्नी रात्री सुमारे २ वाजता जागी झाली असता मुलगा त्यांच्या जवळ झोपलेला होता. मात्र पहाटे ४ वाजता राजन कुंजाम जागे झाले असता मुलगा शेजारी नसल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ परिसरात शोधाशोध केली; परंतु बालकाचा कुठलाही मागोवा लागला नाही.
आज सकाळी राजन कुंजाम यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीमेला वेग दिला आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.