चिकनच्या भाजीवरून वाद,मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून धाकट्या भावाचा खून

Fri 04-Sep-2026,01:59 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर शंकरपुर: येथील धक्कादायक प्रकार.चिकनच्या भाजीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या मानेवर लोखंडी कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना शंकरपूर, ता. चिमूर येथे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रमेश श्रीराम बिनकर (५०) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बिनकर (६३) हा घटनेस कारणीभूत असल्याचे मयताच्या भावाने दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. शंकरपूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये किशोर, जगन आणि रमेश बिनकर हे तीन भाऊ एकत्र राहत होते.

किशोर बिनकर यांना पक्षाघाताचा त्रास असल्याने ते घरीच राहतात. जगन व रमेश हे मजुरीचे काम करीत होते. दोघांनाही दारूचे व्यसन असून, त्यांच्यात यापूर्वीही विविध कारणांवरून वाद होत असल्याचे सांगण्यात आले.

२ सप्टेंबर रोजी रक्षाबंधनानिमित्त नागपूर येथून बहिणी भारती व सुलोचना या भावांना राखी बांधण्यासाठी शंकरपूर येथे आल्या होत्या. त्यांनी भावांसाठी चिकन बनवून सर्वांनी एकत्र जेवण केले. बहिणी दुपारी साडेतीनच्या सुमारास नागपूरला परतल्यानंतर रमेश हा कामावरून घरी आला. सायंकाळी रमेश चिकनची उरलेली भाजी घरात लपवून ठेवून बडबड करीत असल्याचे सांगण्यात आले. यावरून जगनने त्याला जाब विचारला. 

त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. रमेशने जगनला शिवीगाळ केल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने घरातील लोखंडी पात्याची कुऱ्हाड आणून रमेशच्या मानेवर वार केला. कुऱ्हाडीच्या वारामुळे रमेश गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर शंकरपूर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती भिसी पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत कारवाई करत आरोपीला अटक केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.