'AAP'कडून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सरकार आणि टोल कंपनीला निर्वाणीचा इशारा

Sat 13-Sep-2025,11:56 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर:बामणी-बल्लारपूर-चंद्रपूर-भद्रावती-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा आणि धोकादायक स्थिती पाहता, आम आदमी पार्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार टोल कंपनीविरोधात 'आप'ने थेट टोल प्लाझा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.'आप'चे शहर अध्यक्ष, रविकुमार पुप्पलवार यांनी या संदर्भात प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तरीही प्रशासन आणि टोल कंपनी कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीने २०४१ पर्यंत या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, चांगल्या रस्त्याऐवजी खड्डेमय मार्ग देत असतानाही कंपनी लोकांकडून टोल वसूल करत आहे. ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.प्रमुख समस्या आणि 'आप'च्या मागण्या या महामार्गाची दुरवस्था खालील प्रमुख मुद्द्यांमुळे अधिक गंभीर बनली आहे:रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि भरलेली गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. यामुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) ३० हून अधिक नोटिसा पाठवूनही टोल कंपनीने यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव स्पष्ट दिसतो.रवि पुप्पलवार यांनी थेट आरोप केला आहे की,टोल कंपनीला काही मोठ्या राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे ते जनतेच्या जीवाशी खेळत आहेत आणि लोकांच्या भावनांची पर्वा करत नाहीत. निवेदन देण्यासाठी 'आप'ने दोन दिवसांपूर्वीच लेखी सूचना दिली होती, तरीही टोल कंपनीचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. उलट, पोलिसांचा मोठा ताफा बोलावून 'आप'च्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला प्रशासनाची हुकूमशाही प्रवृत्ती की नेत्याचा डोस असे म्हटले आहे. विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीला येत्या ५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे आणि पसरलेली गिट्टी साफ करून रस्ता दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे. जर यावर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर विसापूर टोल प्लाझा १००% बंद पाडला जाईल, असा निर्वाणीचा इशारा पुप्पलवार यांनी दिला आहे. या आंदोलनाचे सर्व परिणाम प्रशासन आणि कंपनीवर राहतील, असेही स्पष्ट केले आहे. जनतेच्या सुरक्षिततेला डावलून टोल वसुली सुरू ठेवणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा ठाम निर्धार 'आप'च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या निवेदनावेळी शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योती बाबरे, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सह संघठन मंत्री सलमा सिद्दिकी, प्रवक्ता आसिफ शेख, शिक्षण आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, युथ अध्यक्ष सागर कांबळे, युथ उपाध्यक्ष स्नेहा गौर, महिला उपाध्यक्षा मनिषा अकोले, डिपो विभाग अध्यक्ष सरमन बंसल, सुशील वासेकर, हर्षद खंडागड़े आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 'आप'चा हा लढा जनतेच्या सुरक्षिततेसाठी असून, जोपर्यंत रस्त्याची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असे आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर समिती ने स्पष्ट केले आहे.