खोब्रामेंढा गावात मोबाईल टॉवर ठप्प,गावकऱ्यांचा संयम सुटला

Sat 04-Oct-2025,11:35 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम खोब्रामेंढा गाव गेल्या वर्षभरापासून मोबाईल नेटवर्कच्या समस्येने कराहत आहे. गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर असला तरी त्याची बॅटरी पूर्णपणे निकामी झाल्यामुळे वीज गेली की टॉवरसुद्धा बंद पडतो. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावात अनेकवेळा दिवसभर नेटवर्क गायब राहते.

आपत्कालीन वेळीही संपर्क अशक्य

गावातील एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे असेल, शासकीय कार्यालयात संपर्क साधायचा असेल किंवा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घ्यायचे असेल – प्रत्येक वेळेस टॉवर ठप्प पडतो. अशा वेळी गावकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. “आधुनिक युगात इतरत्र इंटरनेट वेगाने धावत आहे, आणि आम्ही मात्र मोबाईलवरील एक साधा कॉलही करू शकत नाही. हा आमच्यासाठी मोठा अन्याय आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तक्रारींना प्रतिसाद नाही

ग्रामस्थांनी बीएसएनएल कार्यालयाकडे व वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. पण गेल्या एक वर्षापासून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष दखल घेतलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे.

न्याय मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, जर बीएसएनएल प्रशासनाने तातडीने नवी बॅटरी बसवून मोबाईल सेवा सुरळीत केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. “मोबाईल हे आजच्या काळातील जीवनावश्यक साधन आहे, ते मिळवण्यासाठी जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.