कारवा मार्गावर गुंडागर्दीचा कहर,पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला तीन आरोपी अटकेत

Mon 05-Jan-2026,05:10 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:बल्लारपूर- कारवा मार्गावर पिकनिकहून परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाला अडवून केलेल्या मारहाणीत पोलीस हवालदार सोनसिंह मडावी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ४ जानेवारी २०२६ सायंकाळी घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. रमीज शेख मुर्तुजा शेख रा. झाकीर हुसेन वार्ड, बल्लारपूर, अरबाज खान नाजीम खान रा. टिपू सुलतान चौक, बल्लारपूर असे आरोपींचे नाव आहे.

शिवनगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी गणेश्वरी सोनसिंग मडावी (वय ४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या प्रथम श्रेणी न्यायालय, चंद्रपूर येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती सोनसिंह मडावी हे रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी दुपारी कुटुंबीय व मित्रमंडळींसह मौजा जुनोना येथे पिकनिकसाठी गेले होते.

सायंकाळी सुमारे ६.३० ते ६.४५ दरम्यान बल्लारशाहकडे परतताना कारवा रोडवरील पानठेल्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पिवळ्या रंगाच्या कारजवळील इसमामुळे वाद निर्माण झाला.

वाहनाचा हॉर्न वाजविल्यानंतरही संबंधित इसम रस्त्याच्या बाजूला न झाल्याने वाहन थांबवावे लागले. त्यानंतर त्या इसमाने वाहनाच्या काचांवर जोरजोराने हात मारत गोंधळ घातला.

यावेळी भाचा विकेश वरकडे वाहनातून उतरून विचारणा करताच त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्याच्यावर मारहाण केली. दरम्यान, मोटारसायकलवरून मागून येणारे पोलीस हवालदार सोनसिंग मडावी घटनास्थळी पोहोचून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हाताबुक्याने व दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या कपाळावर, ओठावर व नाकाजवळ गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

जखमी पोलीस हवालदारास तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून कारवाई केली.

या घटनेप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११५(२), ११८(२), १२६(२), ३(५), ३५१(१), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करीत आहेत.

आता दोन दिवसापूर्वी आर्थिक वादातून एका पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने मारहाण केले होते.