पोलीस वर्धापन दिनानिमित्त वर्धा पोलीस मुख्यालयात भव्य पोलीस प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन
जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठान
वर्धा:वर्धा | दि. ०५ जानेवारी पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने वर्धा पोलीस मुख्यालय येथे भव्य पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या शुभहस्ते तसेच अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडले.
या पोलीस प्रदर्शनीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस विभागातील विविध शाखांचे कार्य प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सादर करण्यात आले. यामध्ये न्यायसहाय्यक विज्ञान विभाग, वायरलेस विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक, दामिनी पथक, अग्निशस्त्र व इतर शस्त्रसाठा, सायबर विभाग (ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध), अमली व मादक पदार्थ विरोधी विभाग, डायल ११२ सेवा, वाहतूक शाखा तसेच पोलीस बँड पथक यांचा समावेश होता.
या प्रदर्शनीला जिल्ह्यातील १७ शाळा व महाविद्यालयांतील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांनी भेट देत पोलीस विभागाच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली. श्वान पथकाकडून अमली पदार्थ व स्फोटक पदार्थ शोध प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. श्वान ‘जॉनी’ने सॅल्यूट, वेलकम व आदेश पालनाचे प्रात्यक्षिक सादर केले, तर डॉबरमॅन श्वानाने धावणे, उंच उडी व लांब उडी मारत अडथळे पार करण्याचे कौशल्य दाखविले.
आर्म्स प्रदर्शनीमध्ये पोलीस विभागाकडून वापरण्यात येणारी अग्निशस्त्रे, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, AK-47, AK-56, SLR, दारुगोळा व ग्रेनेड यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून स्फोटक पदार्थ शोध प्रक्रिया, व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था, वाहन व घर झडती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वाहतूक नियंत्रण शाखेकडून हेल्मेट वापराचे महत्त्व, सिग्नल नियम, ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यपान तपासणी, ई-चलान मशीनचे कार्य, तसेच १०८ रुग्णवाहिका व ११२ पोलीस मोफत सेवा क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली. राखीव पोलीस निरीक्षक माजीद शेख यांनी विद्यार्थ्यांना पोलीस मुख्यालयातील एकूण कामकाजाची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रदर्शनीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी पोलीस दलाच्या कार्याचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले व आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सहभागी सर्व शाळा व महाविद्यालयांनी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे आभार मानले.
ही पोलीस प्रदर्शनी उद्या दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुली राहणार असून, नागरिकांनी वर्धा पोलीस मुख्यालय येथे भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात SDPO मकेश्वर, LCB PI विनोद चौधरी, सायबर विभागाचे API चिलंगे तसेच महिला सेलच्या आरती उघडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्थळ : पोलीस मुख्यालय, वर्धा