हृदयविकाराने पोलीस अंमलदाराचा मृत्यू : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Tue 06-Jan-2026,06:55 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : पोलीस स्टेशन भारी येथे कार्यरत तसेच बल्लारपूर पोलीस वसाहतीतील रहिवासी पोलीस अंमलदार विकास अण्णाजी रामटेके (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवार, २ जानेवारी रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलासह परिसरात शोककळा पसरली आहे.

निधनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार तसेच पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी रामटेके यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

विकास रामटेके यांचे अंतिम संस्कार बल्लारपूर येथील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फेरी झाडून दिवंगत पोलीस अंमलदारास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्यविधीस पोलीस अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. विकास रामटेके हे कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे व सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलाने एक निष्ठावान सेवक गमावला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व आप्तपरिवार असा परिवार आहे.