पोलिसांवरील हल्ला प्रकरणातील चौथा आरोपी अटकेत

Wed 07-Jan-2026,01:12 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : कारवा रोड परिसरात ४ जानेवारी रोजी पोलिस हवालदारावर झालेल्या हल्ला प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी फरार असलेल्या चौथ्या आरोपीस अटक केली आहे. जुबेर उर्फ गुड्डू सय्यद जमीर (वय ३१), रा. रविंद्रनगर वॉर्ड, बल्लारपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेतील थरारक तपशील आता समोर आले आहेत.

पोलिस हवालदार मोन सिंह मडावी हे ४ जानेवारी रोजी जुनोना येथून आपल्या परिवारासह पिकनिक करून परत येत होते. सायंकाळच्या सुमारास कारवा रोडवर आरोपींपैकी एक युवक रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याचवेळी मडावी यांचा भाचा चारचाकी वाहनाने तेथून जात असताना आरोपी युवकांनी वाहनाच्या खिडकीवर जोरदार मारहाण केली

त्यामुळे भाचा वाहनाबाहेर उतरून “काय झाले?” असे विचारताच आरोपी युवकांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, हा वाद सुरू असतानाच पोलिस हवालदार मोन सिंह मडावी घटनास्थळी आले. मात्र, परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपी युवकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी मडावी यांना जबर मारहाण केली असून या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर सहा टाके तर तोंडावर तीन टाके पडल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बल्लारपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन बालकाचाही समावेश होता. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, या घटनेतील एक आरोपी फरार होता.

दरम्यान, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपी जुबेर उर्फ गुड्डू सय्यद जमीर यास अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.