वर्ध्यात बॉलिंग व्हिडिओ गेमच्या आड जुगाराचा पर्दाफाश
जिल्हा विशेष प्रतिनिधी युसूफ पठाण वर्धा
रेल्वे स्टेशनसमोर पोलिसांची मोठी कारवाई, ₹76,680 चा मुद्देमाल जप्त
वर्धा | दिनांक : 04 जानेवारी 2026 वर्धा शहरात बॉलिंग व्हिडिओ गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पर्दाफाश केला आहे. वर्धा रेल्वे स्टेशनसमोर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹76,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (IPS) यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा अवैध जुगार व्यवसायाविरोधात सातत्याने कारवाई करीत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी वर्धा सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील वर्धा रेल्वे स्टेशनसमोर मटेरियल स्टोअरच्या चाळीत सुरू असलेल्या “नवदुर्गा बॉलिंग अॅली व्हिडिओ गेम स्टॉल” वर छापा टाकण्यात आला.
बॉलिंग गेमच्या आड सुरू होता हार-जीतवर आधारित जुगार
छापेमारीदरम्यान स्टॉलचा संचालक भारत आमले हा इलेक्ट्रॉनिक मशिन, रंगीत बॉल्स व बॉलिंग गेमच्या साहित्याच्या माध्यमातून हार-जीतवर आधारित जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईच्या वेळी कर्मचारी व ग्राहक जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले.
₹76,680 चा जुगार साहित्य जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून पुढील साहित्य जप्त केले —
प्लास्टिकचे कॉईन,लाकडी चौकोनी गोट्या,जुगाराची रोख रक्कम,डेस्कटॉप संगणक, प्रिंटर, स्कॅनर,टेबल व इतर जुगार साहित्य
एकूण ₹76,680/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
या 10 आरोपींवर गुन्हा दाखल
सरकारी फिर्यादीच्या तक्रारीवरून जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे —
भारत कमलाकर आमले (40) – हिंदनगर, वर्धा,संघपाल इंद्रपाल डांभारे (30) – गणेशनगर, बोरगाव मेघे,प्रिय मनोहर खोबरागडे (54) – गणेशनगर, वर्धा,विकांत चंद्रशेखर समर्थ (48) – डेपो रोड, वर्धा,शेख सैय्यद महमूद (44) – बोरगाव मेघे,लतारी राघव आत्राम (51) – बोरगाव मेघे,संदीप रामुजी अत्राम (34) – चितोडा रोड, बोरगाव मेघे,सागर सुरसुरा (25) – सालोड, वर्धा,विश्वनाथ आडे (32) – वायगाव (भोयर), वरोरा,नेल्सन अलेक्झांडर डिकस (51) – गणेशनगर, बोरगाव मेघे
पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय भूमिका
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.