कारवा रोड परिसरात वाढत्या असामाजिक कृत्यांचा कळस भाजपा तर्फे स्थायी पोलिस चौकीची मागणी.
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील कारवा रोड, मौलाना आझाद वॉर्ड परिसरात वाढत चाललेल्या असामाजिक व बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात काही समाजविरोधी घटकांकडून सातत्याने नशाखोरी, मारहाण, बेकायदेशीर व्यवहार तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात येत असून, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
या परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करणारी धक्कादायक घटना काल, ४ जानेवारी रोजी घडली. याच परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदारावर समाजविरोधी घटकांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे केवळ नागरिकच नव्हे तर पोलिस यंत्रणाही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या असून, माध्यमांतूनही या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना न झाल्याने समाजविरोधी घटकांचे धाडस वाढत असल्याचे चित्र आहे. वेळेत कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहरच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देत कारवा रोड परिसरात तात्काळ स्थायी पोलिस चौकी स्थापन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह यांनी सांगितले की, पोलीस हवालदारावर झालेला प्राणघातक हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून, हा प्रश्न केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेचा नाही तर पोलिसांच्या सुरक्षेशीही संबंधित आहे. स्थायी पोलिस चौकी उभारण्यात आल्यास समाजविरोधी घटकांवर प्रभावी नियंत्रण राहील.
यावेळी भाजपा बल्लारपूर शहर महामंत्री मनीष पांडे, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, भाजयुमो शहराध्यक्ष मिथलेश खेगंर, माजी नगरसेवक स्वामी रायबरम, सुधीर युवा क्लबचे संयोजक ओमप्रकाश प्रसाद, ओबीसी आघाडी अध्यक्ष अमोल झाडे, दलित आघाडी अध्यक्ष महेंद्र ढोके, आदिवासी आघाडी महामंत्री मनोज सुरपराम, ट्रान्सपोर्ट आघाडी संयोजक निर्मलसिंह दारी, अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष सलीम ढाकवाला, भाजपा सचिव प्रभदीप सचदेवा, बबलू गुप्ता तसेच भाजयुमोचे सोशल मीडिया प्रमुख सर्वेश मिश्रा आदी उपस्थित होते.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने पोलिस प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत तातडीने निर्णय घ्यावा व कारवा रोड परिसरात स्थायी पोलिस चौकी स्थापन करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी ठाम मागणी केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांनाही सुरक्षिततेचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.