तंबाखूजन्य व्यसनमुक्तीसाठी निकोटीन अनॉनिमस चे बल्लारपूर येथे शुभारंभ

Sun 14-Dec-2025,05:17 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सवयी व व्यसनातून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दिलासादायक ठरणाऱ्या निकोटीन अनॉनिमस या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या कार्याचे उद्घाटन बल्लारपूर येथे होत आहे. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता, आयडीयल इंग्लिश स्कूल, कला मंदिर, बल्लारपूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बल्लारपूर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, अनेक नागरिक या व्यसनातून बाहेर पडू इच्छितात. मात्र योग्य मार्गदर्शन व आधाराअभावी त्यांना यश मिळत नाही. अशा व्यक्तींसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी निकोटीन अनॉनिमस ही संस्था मोफत स्वरूपात मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करते.

निकोटीन अनॉनिमस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संस्था असून, जगभरात हजारो ठिकाणी नियमित बैठकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी प्रभावी कार्य करीत आहे. तंबाखूजन्य पदार्थांची सवय सोडण्याची इच्छा असलेले तसेच कुटुंबातील कोणाला तरी या व्यसनाचा त्रास होत असलेले नागरिकांनी या सभेला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. रजनी हजारे तसेच नाशिक येथील डॉ. प्रमोद महाजन उपस्थित राहणार असून, ते उपस्थितांना तंबाखूजन्य व्यसनमुक्तीबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

बल्लारपूर परिसरातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.