घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती

Mon 01-Dec-2025,02:09 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपुर : राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर,भद्रावती, वरोरा,ब्रम्हपुरी,मूल, घुग्घुस,गडचांदूर,चिमूर, राजूरा,नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर २०२५ नंतर म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत

तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

त्या अनुषंगाने घुग्गुस नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. ८ ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. १० ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. ९ अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र.७ ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम १७ (१)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. ८ ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. १० ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. ९ अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र.७ ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात निवडणूक आयोगाने आमच्यावर लादलेला हा निर्णय, अन्यायकारक आहे. या निर्णयात धनशक्ती आणि प्रस्तापित नेत्याना लाभ दिसून येतो. यंत्रणेवर नाही. मात्र, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.सरसकट बल्लारपूर नगर परिषदेची निवडणूक थांबवावी.मनोज यादवराव बेले, प्रभाग क्रमांक -९ (अ) चे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार बल्लारपूर.