बल्लारपूरमध्ये तरुणाची वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : सुभाष वॉर्डातील सागर नागेश अंगुरी (वय ३२) यांनी काल सायंकाळी सास्ती मार्गालगतच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार पडल्याने मृतदेह रात्री मिळू शकला नाही.
आज सकाळी चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षातून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने सुरू केलेल्या शोधकार्यात सकाळी अंदाजे ९.३० वाजताच्या सुमारास सागर यांचा मृतदेह नदीत सापडला. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून सागर यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे ४ महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई-वडील असा आप्तपरिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.