वर्धा शहर पोलिसांची कारवाई : प्राणघातक नायलॉन मांजा जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्राणघातक नायलॉन मांजाविरोधात कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, हवालदार पुरा परिसरात राहणारा पंकज भोगे हा आपल्या राहत्या घरी असलेल्या पतंगीच्या दुकानातून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.
छाप्यादरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता मोनो KTC कंपनीच्या नायलॉन मांजाच्या दोन चकऱ्या, अंदाजे ₹१,४००/- किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई माननीय पोलीस निरीक्षक (ठाणेदार) श्री. संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, महिला पोलीस हवालदार अक्षया सावरकर, पोलीस अंमलदार वैभव जाधव व श्रावण पवार सहभागी होते.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजासंदर्भात कुठेही विक्री अथवा साठा असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.