पत्रकार संरक्षण समितीतर्फे आर्वी येथे राज्यस्तरीय पत्रकार दिनाचे आयोजन

Sun 04-Jan-2026,02:04 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर परिसंवाद; उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान

वर्धा : वर्धा पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य (राज्यातील मान्यताप्राप्त पत्रकार संघटना) यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा राज्यस्तरीय पत्रकार दिन २०२६ मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी विदर्भात आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पत्रकार दिन वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील ‘आयनॉक्स सभागृहात’ साजरा होणार आहे.

या कार्यक्रमात ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत समस्या व प्रश्नांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने पत्रकार संरक्षण समितीने शीतकालीन अधिवेशनात ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावावर नेमकी काय कार्यवाही झाली, यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ ग्रामीण पत्रकारांच्या समर्पित जीवनावर व्याख्यान देणार असून, यामधून शासनाकडे विविध प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी सांगितले की, आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय व निष्ठावंत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास खासदार अमर काले, ज्येष्ठ शेतकरी आंदोलन नेते विजय जावंधिया, आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले, तहसीलदार हरीश काले, ज्येष्ठ समाजसेवक अनंत मोहोड, डॉ. सय्यद मजीद, प्रदेश सचिव अनिल चौधरी, स्थानिक समन्वय समितीचे कार्यकारी अध्यक्ष सत्तारभाई शेख, जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप रघाटाटे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र गोरडे, सचिव योगेश कांबळे, सतीश काले, इकबाल शेख, प्रशांत आजनकर, प्रमोद भोजने, अमोल सोटे, गजानन भोरे, प्रवीण करोले, विनोद महाजन, तालुकाध्यक्ष संजिव वाघ, प्रा. राजेश सोलंकी, शिवाजी चंदीवाले, प्रा. प्रदीप झुटी, गजानन जिकार, बालू मुंगले, प्रफुल्ल कुडे, विवेक हांडे यांच्यासह जिल्हा व राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.