सेवाग्राम–हमदापूर रस्त्याचे काम ४–५ वर्षांपासून रखडले; अंबानगरवासीयांचा तीव्र त्रास
प्रतिनिधि अमन नारायणे वर्धा
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम ते हमदापूर या महत्त्वाच्या मार्गावरील अंबानगर गावाजवळील रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही.
या रस्त्याच्या कामासाठी नेमण्यात आलेले अभियंता व ठेकेदार यांनी काम अर्धवट सोडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी व चारचाकी वाहनचालक तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चिखल साचत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंबानगर व परिसरातील नागरिक रस्त्याच्या पूर्णत्वाची वाट पाहत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.