अल्लीपूर भूषण डॉ. सुहासजी भलमे यांना ‘लोकमत हेल्थ एक्सलन्स इन हेल्थकेअर’ पुरस्काराने गौरव

Sat 28-Feb-2026,12:33 PM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर भूषण डॉ. सुहासजी भलमे यांना ‘लोकमत हेल्थ एक्सलन्स इन हेल्थकेअर’ पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत नागपूर येथे दिमाखदार सोहळा

अल्लीपूर (तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे): समाजाचे आरोग्य जपणारे, आजारांचे निदान करून जीव वाचविणारे डॉक्टर हे आधुनिक काळातील देवदूत मानले जातात. त्याग, सेवा आणि समर्पणाची जाणीव जपणारे अल्लीपूर भूषण डॉ. सुहासजी भलमे यांना ‘लोकमत हेल्थ एक्सलन्स इन हेल्थकेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला.

गेल्या ३७ वर्षांपासून अल्लीपूरसारख्या ग्रामीण भागात अविरत रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. भलमे यांनी अल्पशुल्कात हजारो रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले. वैद्यकीय सुविधांचा अभाव असलेल्या काळात अनेक गरोदर महिलांची सुरक्षित प्रसूती करून माता व नवजात बालकांना नवजीवनदान देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

दिवसरात्र २४ तास रुग्णांसाठी तत्पर राहून त्यांनी अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार देत पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात पोहोचविण्यात मदत केली. काही रुग्णांना त्यांनी घरी जाऊनही उपचार सेवा दिली. चिकनगुनिया तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी निस्वार्थ भावनेने सेवा बजावली.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी सैनिकाप्रमाणे जबाबदारी पार पाडली. अनेक वैद्यकीय सेवा बंद असताना डॉ. भलमे यांनी ठामपणे रुग्णसेवा सुरू ठेवत हजारो रुग्णांना उपचार व मानसिक आधार दिला. त्यामुळे अनेक कुटुंबांचे जीव वाचले असून हा काळ नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.

पूरग्रस्त भागातही त्यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली. गावोगावी जाऊन आजारी नागरिकांना उपचार देत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

नागपूर येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, लोकमत समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजयजी दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. भलमे यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ. संगीता भलमे, मुलगा डॉ. शुभम भलमे व सून डॉ. हर्षाली भलमे उपस्थित होते.

डॉ. सुहासजी भलमे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अल्लीपूरसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.