“सिंदी रेल्वे पोलिस प्रकरणाला नवे वळण: ‘निष्पाप शेतकरी’ की अवैध दारू व्यवसायिक?

Tue 21-Apr-2026,03:51 AM IST -07:00
Beach Activities

सिंदी रेल्वे पोलिस प्रकरणाला नवे वळण: ‘निष्पाप शेतकरी’ की अवैध दारू व्यवसायिक? 

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. एका स्थानिक ‘हिंदू जागर’ या वृत्तपत्रामध्ये पोलिस कर्मचारी धनराज सयाम आणि समीर आगे यांच्यावर रिश्वत घेऊन एका निष्पाप अल्पभूधारक शेतकऱ्याला अवैध दारूच्या खोट्या प्रकरणात अडकविल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित बातमीमध्ये शाहरुख इस्माईल पठाण याला पीडित म्हणून सादर करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणात सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार चित्र काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. शाहरुख पठाण याच्यावर अवैध दारू विक्री व वाहतुकीसंदर्भात अनेक गुन्हे यापूर्वीपासून नोंद असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर तो अवैध दारू व्यवसायाशी संबंधित असल्याची चर्चा असून, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही या व्यवसायात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

याशिवाय, काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अवैध दारूविरोधात कारवाई करत असताना शाहरुख पठाण याने ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याचा प्रकार घडल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ‘निष्पाप शेतकरी’ म्हणून त्याची केलेली मांडणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या पार्श्वभूमीवर, एका संशयित अवैध दारू व्यवसायिकाला सहानुभूती मिळवून देण्यासाठी पोलिसांवर गंभीर आरोप लावले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच, संबंधित वृत्तपत्रामध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि आरोपांची मांडणी ही आक्षेपार्ह व एकतर्फी असल्याचा आरोपही होत आहे.

दरम्यान, सतत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात ‘हिंदू जागर’ या वृत्तपत्राचे संपादक रोशन बोडवे (ठाकूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पत्रकारिता क्षेत्रातही चर्चा सुरू झाली असून, माध्यमांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

संपूर्ण प्रकरणामुळे सत्य काय, आरोप कितपत खरे आणि कोणाची बाजू योग्य याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.