गरिबांवर बुलडोझर, बड्यांना मोकळा मार्ग? वसमत अतिक्रमण मोहिमेवर प्रश्नचिन्ह

Thu 30-Apr-2026,06:32 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषदेने मोठ्या गाजावाजात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अवघ्या दोन दिवसांतच थंडावल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला किरकोळ व्यापारी, हातगाड्या आणि टपऱ्यांवर बुलडोझर फिरवणारे प्रशासन आता मोठ्या अतिक्रमणांपुढे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रफिक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली कारंजा चौक ते महावीर चौक आणि झेंडा चौक परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे काही काळ रस्ते मोकळे झाल्याचे दिसून आले. मात्र, मोहीम अचानक थांबल्याने काढलेले अतिक्रमण पुन्हा उभे राहत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, “छोट्या विक्रेत्यांवरच कारवाई का? मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर का नाही?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवरही अनेक ठिकाणी बड्या लोकांचे अतिक्रमण कायम असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारे अतिक्रमण मोहिमा राबवून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ‘रिव्हर्स गिअर’ हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

२८ एप्रिल रोजी मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई होणार होती, मात्र अचानक मोहीम थांबवण्यात आल्याने ‘दबावाखाली निर्णय घेतला का?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता ही मोहीम पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होणार का, याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.