सोलर पॅनल बसविण्यास तीन महिन्यांचा विलंब; ईएमआय सुरू, ग्राहकाकडून फसवणुकीची शंका

Sun 14-Jun-2026,02:32 AM IST -07:00
Beach Activities

सोलर पॅनल बसविण्यास तीन महिन्यांचा विलंब; ईएमआय सुरू, ग्राहकाकडून फसवणुकीची शंका

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

सावंगी मेघे : सावंगी मेघे येथील जुन्या वस्तीतील रहिवासी विक्की नेवारे यांनी घरावर 3.50 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्यासाठी अमोल नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला होता.

संबंधित व्यक्तीने त्यांना सोलर प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 75 हजार रुपये असून हे काम नामांकित कंपनीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती दिल्याचा दावा नेवारे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी विक्की नेवारे यांनी एसबीआय बँकेतून कर्ज घेतले. कर्जाच्या रकमेपैकी सुमारे 70 टक्के रक्कम संबंधित सोलर पॅनल पुरवठादाराच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर काही साहित्य नेवारे यांच्या घरी आणून ठेवण्यात आले. तसेच सोलर पॅनल बसविण्यासाठी स्ट्रक्चरही उभारण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही प्रत्यक्ष सोलर पॅनल बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विक्की नेवारे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरी ठेवण्यात आलेले साहित्यही स्थानिक दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे.

मात्र त्यांना नामांकित कंपनीचे सोलर सिस्टम बसवून देण्याचे आश्वासन देण्यात होते.

त्यामुळे या संपूर्ण व्यवहारात अनियमितता असून संभाव्य फसवणूक झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बँकेकडून मंजूर झालेल्या कर्जाची मासिक ईएमआय सुरू झाली असून सोलर प्रकल्प पूर्ण न होता देखील दरमहा भरावा लागत असल्याने आर्थिक भार वाढत असल्याचे नेवारे यांनी सांगितले.

या संदर्भात एसबीआय बँकेशी संपर्क साधला असता, कर्ज मंजूर झाल्यानंतर नियमानुसार ईएमआय भरणे आवश्यक असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

बँकेची भूमिका कर्ज मंजुरी व वसुलीपर्यंत मर्यादित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तीन महिन्यांनंतरही काम पूर्ण न झाल्याने नेवारे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सोलर पॅनल तातडीने बसविण्यात यावेत तसेच दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासन, संबंधित कंपनी कड़े केली आहे.

 

स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्राहकाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.