गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ७९९ ग्रॅम गांजासह ₹२१,९२५ चा मुद्देमाल जप्त
गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ७९९ ग्रॅम गांजासह ₹२१,९२५ चा मुद्देमाल जप्त
वर्धा तालुका | प्रतिनिधी : इरशाद शहा
वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या ॲण्टी नार्कोटिक्स पथकाने हिंगणघाट येथे धडक कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली. आरोपीच्या ताब्यातून ७९९ ग्रॅम गांजा, रोख रक्कम असा एकूण ₹२१,९२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबविली असून, दि. २८ जुलै २०२६ रोजी ॲण्टी नार्कोटिक्स पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर परिषद वाचनालयामागील टाका ग्राउंड परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान साहिल उर्फ नायडू सतीश माणिके (वय २४, रा. भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट) हा गांजाची विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ७९९ ग्रॅम गांजा व रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपी गांजाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीच जप्ती पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी तसेच पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, अनुप राऊत, रवी पुरोहित आणि सागर भोसले यांच्या पथकाने केली.