नांदगाव पोडे येथे बालसंरक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Sat 01-Aug-2026,08:31 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर तसेच पंचायत समिती बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय गोपाल वानखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव पोडे येथे बालसंरक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण विषयक जनजागृती कार्यक्रम ३१ जुलै रोजी उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी धनंजय साळवे होते. यावेळी केंद्रप्रमुख नागेंद्र कुंमरे, प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मांडवे, डॉ. तिपावी, ग्रामविकास अधिकारी विकास दुधे, मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनच्या सुपरवायझर बबीता लोहकरे, केस वर्कर विजय अमर्थराज, ग्रामीण आरोग्य विभाग विसापूरच्या परिचारिका, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना गुड टच–बॅड टच, बालसंरक्षण, संकटाच्या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चा वापर, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक दुष्परिणाम, तसेच बालकांचे हक्क आणि संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. चाइल्ड हेल्पलाइनकडे येणाऱ्या संकटग्रस्त मुलांच्या उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. याशिवाय बाल संगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र योजना आणि सखी वन स्टॉप सेंटर (१८१) यांच्या कार्याची माहिती देत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरच्या डॉ. अश्विनी कांबळे यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एचपीव्ही (HPV) लसीचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. विशेषत १४ ते १५ वर्षे वयोगटातील बालिकांनी ही लस आवर्जून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लसीकरण पूर्ण केलेल्या बालिकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संबंधित विद्यार्थिनींनी लसीकरणाबाबतचे सकारात्मक अनुभवही उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन (एचबी) रक्त तपासणी करण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका कुचनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहिणी गुरुविले यांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून बालसंरक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात यश आले.