शेतकऱ्याच्या घरातील कपाट फोडून ६८ हजारांचा लंपास
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथे शेतकऱ्याच्या घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व ३३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीने आपल्या पत्नीच्या मेहुणीवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारत आडकू दाहगावकर ५२ वर्षे रा. सोमनपल्ली, ता. गोंडपिपरी हे शेती व्यवसाय करतात. शेती व मजुरीतून साठवलेल्या पैशातून त्यांनी पत्नीसाठी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, सोन्याच्या बाळ्या, सोन्याची नथ तसेच चांदीचा कडा खरेदी केला होता.
याशिवाय धान विक्री व मजुरीतून मिळालेली ३३ हजार रुपयांची रोकड घरातील लोखंडी कपाटात ठेवण्यात आली होती.
२४ जुलै रोजी त्यांच्या पत्नीची मेहुणी संध्या चांदेकर ही मुलीसह त्यांच्या घरी मुक्कामासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी तक्रारदार व त्यांची पत्नी बाहेर गेल्यानंतर ती काही काळ घरात एकटीच होती. त्यानंतर मुलाची तब्येत बरी नसल्याचे सांगून ती चंद्रपूरला निघून गेली.
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी सकाळी खतासाठी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले असता त्यामधील ७ ग्रॅमचे मंगळसूत्र, १.५ ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या, सोन्याची नथ, सहा तोळ्यांचा चांदीचा कडा आणि ३३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले. घरात सर्वत्र शोध घेऊनही ऐवज न सापडल्याने चोरी झाल्याची खात्री झाली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ही चोरी झाली असून, त्यांनी आपल्या तक्रारीत संध्या चांदेकर हिच्यावर संशय व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून कोणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही. या प्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.