बस स्थानकात न नेता आगाराजवळच प्रवाशांना उतरविले,महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत आहे नाहक त्रास
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : राजुरा देवाडा - पाचगाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांना नियमित बसस्थानकात न नेता राजुरा मुख्य आगाराजवळच उतरविल्याचा प्रकार शनिवारी २९ ऑगस्ट सायंकाळी घडल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक ३६४३ ही बस सायंकाळी कोष्टाळा येथून राजुराकडे येत होती. बसमध्ये सुमारे १६ ते १७ महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकही होते. राजुरा येथे आल्यानंतर बस मुख्य आगाराजवळ थांबविण्यात आली.
प्रवाशांना बसस्थानकात न नेता तेथूनच पुढे पायी जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
बसस्थानकात सोडण्याची विनंती प्रवाशांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे समजते. बसमधील काही प्रवाशांचे नातेवाईक राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाणारे प्रवासीही होते. त्यातच पाऊस सुरू असल्याने आगाराजवळ उतरविलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास राजुरा बसस्थानकात लेखी निवेदन दिल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित वाहकाने यापूर्वीदेखील अशाच प्रकारे प्रवाशांना बसस्थानकात न नेता बाहेर उतरविल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून संबंधित चालक-वाहकावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.