संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा ऐरणीवर

Fri 04-Sep-2026,08:29 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत शहरातील हाउसिंग सोसायटी संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील मोकळ्या जागेच्या कथित अतिक्रमण व नामांतर प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून,ऑगस्ट 2026 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाने या प्रकरणाची दखल घेतल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. नगर विकास विभागाच्या निर्देशानंतर वसमत नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीस पत्र देत कथित अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम बाबत कारवाईचा इशारा दिल्याने प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.

या प्रकरणासंदर्भात संघर्ष समितीप्रमुख अॅड. शिवाजी नारायणराव अडकिणे यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार सादर केली होती. तक्रारीत संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील मोकळ्या जागेच्या नामांतर प्रक्रियेबाबत तसेच संबंधित जागेवरील बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 

18 जूनला नगर विकास विभागाचे निर्देश-

 

उपलब्ध पत्रव्यवहारानुसार, तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाने 18 जून 2026 रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद वसमत यांना पत्र पाठविले. या पत्राद्वारे तक्रारीतील मुद्द्यांवर नियमोचित कार्यवाही करून मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून नगर परिषद प्रशासनाकडे प्रकरणाबाबत पत्रव्यवहार झाल्याने या विषयाची प्रशासकीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

 

30 जूनला नगर परिषदेकडे पत्र प्राप्त

 

नगर विकास विभागाचे पत्र व संबंधित तक्रारीची नोंद 30 जून 2026 रोजी नगर परिषद वसमत कार्यालयात प्राप्त झाल्याचे पत्रव्यवहारातून दिसून येते. त्यानंतर या प्रकरणाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली.

 

24 ऑगस्टला मुख्याधिकाऱ्यांची कारवाईची सूचना

 

दरम्यान, 24 ऑगस्ट 2026 रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद वसमत यांनी संबंधित व्यक्तीस लेखी पत्र दिले. या पत्रात संबंधित जागेवरील बांधकामाबाबत पूर्वीही नोटिसा देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, नगर परिषदेच्या निदर्शनास संबंधित बांधकाम अनधिकृत व अतिक्रमणाच्या स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधितास संकटमोचन मारुती मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण व बांधकाम स्वतःहून काढून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

 

अन्यथा नगर परिषदेकडून नियमानुसार अतिक्रमण व बांधकाम हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच त्यासाठी होणारा खर्च संबंधिताकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला असल्याचे कागदपत्रांतून दिसून येते.

 

2022 ची पार्श्वभूमी, मात्र 2026 मधील कारवाई ठरली केंद्रबिंदू

 

या प्रकरणात यापूर्वी 2022 मध्येही संबंधित बांधकामाबाबत नोटिसा व पत्रव्यवहार झाल्याचा उल्लेख उपलब्ध कागदपत्रांमध्ये आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींचा केंद्रबिंदू हा 2026 मधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाचे निर्देश आणि त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार हा आहे.

जुना प्रश्न पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर आल्याने मंदिर परिसरातील कथित अतिक्रमणाचा विषय चर्चेत आला आहे.

 

पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष -

 

मंदिर परिसरातील मोकळ्या जागेच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्न आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर पोहोचल्यानंतर आणि त्यानंतर नगर परिषदेकडून संबंधितास कारवाईची सूचना दिल्यानंतर प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 

तक्रारीतील आरोप, संबंधित व्यक्तीची बाजू तसेच मालकी हक्क व नामांतरासंबंधी कागदपत्रांची सक्षम पातळीवर पडताळणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी जनहितार्थ मागणी होत आहे.

 

 

नोटीसनंतरही अतिक्रमण जैसे थे ?;

 कारवाई कधी होणार.?

 

संकटमोचक हनुमान मंदिराच्या मोकळ्या जागेवरील कथित अतिक्रमणाच्या प्रकरणात नगर परिषद वसमतच्या मुख्याधिकाऱ्यांनी गणेश कोंडीबा काळे, रा.वसमत यांना 24 ऑगस्ट 2026 रोजी लेखी नोटीस देऊन संबंधित अतिक्रमण व बांधकाम स्वतःहून काढून घेण्याची सूचना केली आहे. मात्र नोटीस दिल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी लोटत असतानाही संबंधित अतिक्रमण अद्याप हटविण्यात आले नसल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार,स्वतःहून अतिक्रमण व बांधकाम न हटविल्यास नगर परिषदेकडून नियमानुसार कारवाई करून ते हटविण्यात येईल आणि त्यासाठी येणारा खर्च संबंधिताकडून वसूल करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानंतर या प्रकरणाने पुन्हा वेग घेतला आहे. मुख्याधिकाऱ्यांची नोटीस होऊनही अद्याप प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमधून “नोटीस दिली, पण कारवाई कधी?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.