विसापूरात संततधार पावसाने घराची भिंत कोसळली:जीवितहानी टळली

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर: बल्लारपूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर सुरू असताना रविवारी, १४ ला सकाळी साडेसातच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील रामदास इटनकर यांच्या घराची स्वयंपाकघराची भिंत कोसळली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र स्वयंपाकघरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.भिंत कोसळल्याने गॅस शेगडी, भांडी, तसेच इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाले. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या वेळी कुटुंबीय अन्य खोलीत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान, संततधार पावसामुळे विसापूर परिसरात जुन्या व कच्च्या घरांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेतून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पीडित रामदास इटनकर यांनी केली आहे.स्थानिक ग्रामस्थांनीही याकडे लक्ष वेधत, गावातील इतर कच्च्या घरांची पाहणी करून अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. संततधार पावसामुळे विसापूर गावांमध्ये अनेक जुनी व कच्ची घरे धोक्याच्या स्थितीत आली आहेत.काही घरांतील भिंती व छपरांमध्ये गळती सुरू असून, तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठे अपघात होऊ शकतात. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धोकादायक घरांची पाहणी करून तत्काळ मदत करण्याची मागणी केली आहे.