नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचा लाभ घ्यावा — पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Wed 21-Jan-2026,10:42 AM IST -07:00
Beach Activities

➤ शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

➤ कृषि योजना, निविष्ठा व प्रात्यक्षिकांचे २०० स्टॉल

➤ शेतमालाची शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संधी

 

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठान

 

वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर दि. २३ ते २७ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळणार असून, शेतमालाच्या थेट विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA), पशुसंवर्धन विभाग, उमेद अभियान व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पाच दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात एकूण २०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, दि. २३ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सलग तीन दिवस शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान व महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

या महोत्सवात विकसित कृषि तंत्रज्ञान, शासकीय कृषि व पशुसंवर्धन योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ व तज्ज्ञ यांच्यातील संवादातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, गटशेती व विपणन साखळी मजबूत करणे, शेतमालाला योग्य दर मिळवून देणे तसेच ग्राहकांना उच्च दर्जाचा माल उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी, व्याख्याने, परिसंवाद तसेच विक्रेता–खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख शेतीस चालना दिली जाणार आहे.

महोत्सवात विविध शासकीय योजनांचे ४० स्टॉल, कृषि निविष्ठा पुरवठादारांचे ४० स्टॉल, खाद्यपदार्थांचे १५ स्टॉल, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे २० स्टॉल, सूक्ष्म सिंचनाचे ३ स्टॉल, शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांचे ४० स्टॉल, विविध योजनांचे प्रत्यक्ष देखावे १०, महिला बचत गटांच्या उत्पादनांचे १५ स्टॉल, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचे २० स्टॉल तसेच कृषि यांत्रिकीकरण व रोपवाटिका विषयक ८ स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील हवामानानुसार पिक पद्धती, कृषि प्रक्रिया उद्योग, पूरक व्यवसाय, शासनाचे कृषि धोरण, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, कृषि निर्यातीच्या संधी व कागदपत्र प्रक्रिया, शेतमाल मूल्यवर्धन आदी महत्त्वाच्या विषयांवर संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार तूर डाळ, मूग, हळद, मसाले, तीळ, सेंद्रिय गूळ तसेच भाजीपाला व फळे विक्रीस उपलब्ध असणार आहेत.

या महोत्सवाचा लाभ शेतकरी, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.