शिरड शहापूरमध्ये श्री सारंग स्वामी यात्रे निमित्त भव्य कुस्तीचे दंगल
प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:औंढा तालुक्यातीलऔंढा नागनाथ परिसरातील शिरड शहापूर येथे श्री सारंग स्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले. श्री सारंग स्वामी मठ संस्थान यांच्या वतीने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद यंबल यांच्या कुशल नेतृत्वाखाली झालेल्या या कुस्ती महोत्सवामुळे संपूर्ण पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नामवंत मल्ल दाखल झाले होते. लालमातीतील थरारक, चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण कुस्त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यातील प्रत्येक डावात मल्लांनी दाखवलेली ताकद, चिकाटी आणि तांत्रिक कौशल्य पाहून प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता.विजेत्या मल्लांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून ५१ हजार रुपये व चांदीची गदा ठेवण्यात आली होती. तसेच २१ हजार रुपयांची बक्षिसे आणि इतर अनेक आकर्षक पारितोषिकांमुळे मल्लांमध्ये विशेष उत्साह संचारला होता.
या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आखाडापरिसरात उत्साह, जल्लोष आणि शिस्तबद्ध आयोजनाचे सुंदर चित्र दिसून येत होते.
या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधींसह सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण यात्रा महोत्सव व कुस्त्यांची दंगल यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, कुस्ती कमिटी, पंच कमिटी तसेच शिरड शहापूर, सारंगवाडी व गवलेवाडी येथील समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.