शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिकांची कुचंबणा
वर्धा तालुका प्रतिनिधि इरशाद शाह
वर्धा:वर्धा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित अधिकारी व जबाबदार कर्मचारी अनेकदा आपल्या टेबलवर उपस्थित नसल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी वर्धा यांनी तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वर्धा, पंचायत समिती वर्धा, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका, समाजकल्याण कार्यालय तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील इतर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी नियमितपणे येत असतात. मात्र अनेक वेळा संबंधित टेबलवरील जबाबदार कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येते. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी कोणत्या पदावर कार्यरत आहेत, याची माहिती देणारे नावफलक, पदनाम किंवा ओळखपत्र (आयडी कार्ड) टेबलवर नसल्याने नागरिकांची अधिकच दिशाभूल होत आहे.
काही कार्यालयांमध्ये ‘लंच टाईम’च्या नावाखाली एक ते दोन तासांपर्यंत कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी सामान्य नागरिकांची कामे रखडतात, वेळ व पैसा वाया जातो आणि प्रशासनाविषयी नकारात्मक भावना निर्माण होत आहे.
यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की बंद, याची सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी वर्धा यांनी स्वतंत्र धाडपथक (फ्लाइंग स्क्वॉड) स्थापन करून कोणतीही पूर्वसूचना न देता विविध कार्यालयांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी. तपासणीदरम्यान अधिकारी किंवा कर्मचारी गैरहजर आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
अशा प्रकारच्या प्रभावी कारवाईमुळे प्रशासन खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यरत असल्याचा विश्वास निर्माण होईल आणि भविष्यात नागरिकांची होणारी गैरसोय टळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी युवा : परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटक दिनेश परचाके, जिल्हा संपर्क प्रमुख अमित भोसले, शेखर इंगोले, आशिष जाचक, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा, मनोजभाऊ कळमकर, वर्धा उपाध्यक्ष अमन नारायण, दिनेश देवतळे, अमीन पठाण, प्रशांत गुरनुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.