वर्धा पोलिसांची मोठी कारवाई,मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी : युसुफ पठाण वर्धा
वर्धा, दि. १४ जानेवारी २०२६ रस्त्यावरील सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वर्धा पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने आज बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास आर्वी नाका रोड परिसरात मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या युवकावर पोलिसांनी कडक कारवाई केली.
आर्वी नाका रोड येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाला एक युवक संशयास्पद पद्धतीने दुचाकी चालवताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी व तपासणी केली असता, तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित आरोपी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH 32 AV 0292 सह सार्वजनिक रस्त्यावर स्वतःसह इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण करताना आढळून आला.
या प्रकरणी वर्धा पोलिसांनी आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ (मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे) तसेच कलम ३/१८१ (वैध परवाना नसणे/नियमांचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल आणि पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक फौजदार संजय भांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कांबळे, पोलीस हवालदार शब्बीर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कोहळे तसेच महिला पोलीस हवालदार जोशना मेश्राम यांचा सहभाग होता.
दरम्यान, मद्यपान करून वाहन चालवू नये व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वर्धा पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे