पर्यवेक्षक पदाची मान्यता व नियमित वेतनासाठी रत्नमाला मेढे यांचे धरणे आंदोलन

Thu 15-Jan-2026,11:08 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा शहर प्रतिनिधी : अमन नारायणे

भीम आर्मी (भारत एकता मिशन)चा जाहीर पाठिंबा

वर्धा : वर्धा पर्यवेक्षक पदाची अधिकृत मान्यता देऊन नियमित वेतन मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी सौ. रत्नमाला मेढे यांनी दिनांक 8/11/2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध पुरोगामी संघटनांच्या सहकार्याने धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदर प्रकरण गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून प्रलंबित असून, संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

या प्रकरणाची माहिती भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने घेतल्यानंतर, हा विषय सध्या मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मा. अनुसूचित जाती-जमाती आयोग तसेच शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी या प्रकरणात निर्णय घेऊन न्याय देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असतानाही प्रशासनाकडून होत असलेला विलंब हा अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलक व संघटनांकडून करण्यात येत आहे. या विलंबामुळे सौ. रत्नमाला मेढे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या अन्यायाविरोधात **भीम आर्मी (भारत एकता मिशन)**ने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता त्वरित न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे (रावण), जिल्हा संघटक आशिष सलोडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे, बबलू भाऊ राऊत, शुभम डुबडूबे, अनुराग डोंगरे, रोशन झामरे, सनी खैरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.