मिरापूरसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी; ग्रामविकास मंत्री व वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे थेट अर्ज

Wed 21-Jan-2026,10:51 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा | तालुका प्रतिनिधि इरशाद शाह

मिरापूर (ता. वर्धा) येथील ग्रामस्थांनी मिरापूर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. हा अर्ज सौरभ मनोहर गोडे व मिरापूर येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यासोबतच सदर मागणीबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ई-मेलद्वारेही निवेदन पाठवण्यात आले आहे.

सध्या मिरापूर गाव हे नेरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत असून, मागील अनेक वर्षांपासून मिरापूरला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. त्यामुळे गावाच्या विकासकामांवर मर्यादा येत असून मूलभूत सुविधा व प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मिरापूर येथील आशा वर्कर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत गावाची एकूण लोकसंख्या 778 इतकी आहे. यामध्ये 388 महिला व 390 पुरुष यांचा समावेश असून, शासनाने ठरवून दिलेले लोकसंख्येचे निकष पूर्ण होत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आशा वर्कर यांनी केलेला सर्वे ग्राह्य धरून मिरापूर येथे तात्काळ स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, वर्धा जिल्हा पालकमंत्री कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय नेरी (मिरापूर) तसेच देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

आता ग्रामविकास विभाग व पालकमंत्री कार्यालय या मागणीवर कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण मिरापूर गावाचे लक्ष लागले आहे.