कुरझडी (जामठा) गाव मोबाईल नेटवर्कपासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप
वर्धा तालुका प्रतिनिधि इरशाद शाह
कुरझडी (जामठा) गावात आजतागायत एकही मोबाईल नेटवर्क टॉवर उभारला गेलेला नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गाव मोबाईल संपर्कापासून वंचित आहे. २१व्या शतकातही नागरिकांना फोन करण्यासाठी टेकड्या-डोंगरावर जावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ठप्प झाले आहे, रुग्णांना आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधता येत नाही, तर शासकीय योजना, डिजिटल व्यवहार व प्रशासकीय सेवा कागदोपत्रीच मर्यादित राहिल्या आहेत. एखादी आपत्ती किंवा गंभीर वैद्यकीय प्रसंग उद्भवल्यास संपर्काअभावी जीवितहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
‘डिजिटल इंडिया’च्या घोषणा मोठ्या आवाजात दिल्या जात असताना कुरझडी (जामठा) गाव मात्र अद्याप नेटवर्कच्या अंधारात आहे. प्रशासन व संबंधित विभागांकडून वर्षानुवर्षे केवळ आश्वासनांची पोकळी दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या मागणीसाठी अमित अरुणराव भोसले, आशिष जाचक, शेखर इंगोले व नानाजी शिडाम यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र शब्दांत निवेदन दिले आहे. कुरझडी (जामठा) येथे तात्काळ योग्य ठिकाणी मोबाईल नेटवर्क टॉवर उभारून संबंधित दूरसंचार कंपन्यांना तातडीचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष न करता त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा स्पष्ट इशाराही नागरिकांनी दिला आहे.