बल्लारपूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Fri 06-Mar-2026,10:52 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील राजेंद्र प्रसाद नगर वॉर्ड परिसरात एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आशिष सुरेश वागदे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आशिषचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, तर आई घरातील काम करत होती. काही वेळाने आई घरात गेली असता आशिष गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांना पाचारण करून त्याला खाली उतरविले व ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, आशिष नशेच्या आहारी गेल्याची चर्चा परिसरात सुरू होती; तथापि याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत व ठोस माहिती समोर आलेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार व पोलीस अंमलदार गोकुळ कुसराम करीत आहेत.