चोंडी टी-पॉईंट वळण ठरतोय ‘मृत्यूचे वळण’
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली :वसमत-औंढा नागनाथ मार्गावरील चोंडी टी-पॉईंट येथील धोकादायक वळण सध्या वाहनधारकांसाठी मोठा जीवघेणा ठरत असून, गेल्या दोन दिवसांत येथे दोन विचित्र अपघात घडले. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वळणावर अनेकदा वाहनांमधून डिझेल, ऑइल व केमिकल सांडल्याने रस्ता अत्यंत घसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनचालक वारंवार स्लीप होऊन अपघातग्रस्त होत आहेत. याबाबत अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
१२ मेच्या मध्यरात्री औंढा नागनाथकडून येणारी कार (क्र. MH 20 GK 3914) वळण घेताना समोरील डिव्हायडरवर चढली. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी थोडक्यात बचावले. त्यानंतर १३ मेच्या मध्यरात्रीb वसमतकडून औंढा नागनाथकडे जाणारी बोलेरो (क्र. MH 12 SY 786) वळण घेताना नियंत्रण सुटून चार ते पाच पलट्या घेत शेतात जाऊन उलटली. या अपघातात वाहनाचे चारी टायर वर झाले होते. बोलेरोमधील चार प्रवाशांचेही बालंबाल प्राण वाचले.
अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामदास निरदोडे, जमादार ढोबरे, जमादार पवार, जमादार हाराळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलीस मित्र सत्र विकास सरोदे व चंपती भोसले यांच्या सहकार्याने जखमींना वाहनाबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे वसमत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी असलेले वळण रात्री सहज लक्षात येत नाही. परिसरात प्रचंड अंधार असून, येथे बसविण्यात आलेला हायमास्ट दिवा गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तो केवळ शोभेची वस्तू बनल्याची टीका वाहनधारकांकडून होत आहे.
परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने हायमास्ट सुरू करून येथे गतिरोधक, सूचना फलक व प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.