सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बल्लारपूरात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

Tue 21-Jul-2026,07:47 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: दिल्लीतील जंतरमंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, नीट (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरण तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन, बल्लारपूरच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले. शहरातील विविध विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांनी या आंदोलनात सहभागी होत शांततापूर्ण पद्धतीने पाठिंबा दर्शविला.

दुपारी एक वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी आमिष मेश्राम (दहेली), अभिलाष चुनारकर, ॲड. प्रियंका चव्हाण, अफजल अली, सुमित गोरघाटे, अंकुश जीवने आणि शुभम पगारे यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अन्नत्याग करून एकदिवसीय उपोषणात सहभाग नोंदविला.

आंदोलनात बल्लारपूर शहरातील विविध कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार यावर आपली मते मांडली.

आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून तहसील कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले. तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात नीट (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरणाची वेळबद्ध व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शांततापूर्ण आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यावेळी अंकुश जीवने, नितीन खानोरकर, साहिल मेश्राम, अमन निरंजने, शुभम चिकटे, प्रियंका दुपारे, एकता भगत, वनश्री चांदेकर, अपूर्वा वाळके, अंजुभारती, विशाखा रायपुरे, प्रगती शर्मा, रिंकल भगत, आदित्य शर्मा, दिव्या अलोने यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकजूट दाखविण्याचे आवाहन केले.

 हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अभिलाष चुनारकर, आमिष मेश्राम, ॲड. प्रियंका चव्हाण आणि अमर धोंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले