वसमतमध्ये कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याचा आरोप,नगर उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा,१९ जनावरांची सुटका

Wed 29-Jul-2026,11:40 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली :वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धाडीत १९ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत सुमारे १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे पशुधन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी वसमत नगरपालिकेचे विद्यमान नगर उपाध्यक्ष सैय्यद इम्रान सैय्यद नाशेरअली यांच्यासह संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.५० वाजता जवळा खंदारबन शिवारातील शेत गट क्रमांक ३२ येथे छापा टाकण्यात आला. तेथे गायी, गोऱ्हे व कारवडी मिळून एकूण १९ जनावरे अत्यंत हालअपेष्टेत बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले. जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली होती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरिफ बशीर दोसानी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील कलम ५(अ), ५(क), ९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० मधील कलम ११(१) अंतर्गत विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार उपरे करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे वसमतच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, एका विद्यमान लोकप्रतिनिधीचे नाव या प्रकरणात समोर आल्याने विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम जबाबदारी निश्चित होणार आहे.