गोवंश तस्करी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान यांचा पुनरुच्चार

Sun 02-Aug-2026,01:41 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत तालुक्यात उघडकीस आलेल्या गोवंश तस्करी प्रकरणाशी आपला कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नासेर अली यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी तपास यंत्रणांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

पत्रकार परिषदेत बोलताना सय्यद इम्रान म्हणाले की, काही व्यक्तींकडून राजकीय आणि वैयक्तिक हेतूने त्यांचे नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना अशा प्रकारच्या अफवा पसरविणे चुकीचे असून, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असेही त्यांनी नमूद केले.

"एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला म्हणजे ती व्यक्ती दोषी ठरत नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येते. त्यामुळे नागरिकांनी संयम राखून केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, खंदारबन शिवारात गोवंश तस्करीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर या प्रकरणाचा तपास वसमत ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.