समुद्रपूर पोलिसांची धडक कारवाई; २१.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपूर पोलिसांची धडक कारवाई; २१.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूसाठा वाहतूक करणारे वाहन आजदा शिवारात पकडले; तिघांना अटक
वर्धा, युसूफ पठाण
समुद्रपूर : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूसाठ्याची वाहतूक करून त्याचा पुरवठा करण्याच्या तयारीत असलेल्या वाहनावर समुद्रपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. आजदा शिवारात पाठलाग करून अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहन क्रमांक एमएच ३२ एजे ६७८० पकडण्यात आले. या कारवाईत वाहनासह एकूण २१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी आजदा शिवारात सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन अडविले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांच्या देशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
यामध्ये राकेट कंपनीच्या ३५ खोक्यांमध्ये ९० मिली क्षमतेच्या ३ हजार ५०० बाटल्या, अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये; कोकण कंपनीच्या ५३ खोक्यांमध्ये ५ हजार ३०० बाटल्या, किंमत ५ लाख ३० हजार रुपये; तसेच टँगो कंपनीच्या ५ खोक्यांमध्ये ५०० बाटल्या, किंमत ५० हजार रुपये, असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय १२ लाख रुपये किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केले.
या प्रकरणी आशिष हाडके (रा. कडाजना, हिंगणघाट), अरविंद रामगुंडे (रा. कडाजना, हिंगणघाट) आणि गंगा थूल (रा. आजदा) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार दीपक वानखेडे, पोलीस निरीक्षक गिरीश मोहोदुरे, विक्की मस्के, पोलीस हवालदार प्रकाश मैद, कपिल मेश्राम, संदीप उईके आणि संजय वानखेडे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.