मनोज जरांगे पाटील यांच्या व्हिडिओ कॉलवरील आदेशानंतर रविकिरण वाघमारे यांनी सोडले १५ दिवसांचे आमरण उपोषण

Mon 14-Sep-2026,02:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तहसील कार्यालयासमोर २९ ऑगस्टपासून सुरू असलेले रविकिरण वाघमारे यांचे आमरण उपोषण अखेर पंधराव्या दिवशी मागे घेण्यात आले. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपोषणकर्त्याशी संवाद साधत उपोषण सोडण्याचा आदेश दिल्यानंतर वाघमारे यांनी उपोषण सोडले.

रविकिरण वाघमारे हे गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने सकल मराठा समाजातील बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, वसमत विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तुषार जाधव यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी तुषार जाधव यांच्या मोबाईलवरून जरांगे पाटील यांनी उपोषणकर्ते रविकिरण वाघमारे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वाघमारे यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करत, “लढाई अजून बाकी आहे. माझ्या आदेशाने उपोषण सोडा. पुढील आंदोलन मी सांगेन तसे करा,” असे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचा मान राखत रविकिरण वाघमारे यांनी उपोषणाच्या पंधराव्या दिवशी आमरण उपोषण सोडले.

उपोषण सोडताना रविकिरण वाघमारे यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांनी तुषार जाधव यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून उपोषण सोडण्याचा आदेश दिला. त्यांच्या आदेशाचे पालन करत आज उपोषण सोडले असून, यापुढील आंदोलनही मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार केले जाईल. वसमत येथील आमरण उपोषण संपले असले तरी मराठा आरक्षणाची लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सकल मराठा समाजातील शेकडो मराठा बांधव, महिला व तरुण उपस्थित होते. उपोषण मागे घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले.

दरम्यान, वसमत तहसील प्रशासनानेही उपोषणाची दखल घेत वरिष्ठ प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल पाठविल्याची माहिती आहे.